खुलासा - मी “छावा” हा चित्रपट पाहिलेला नाही, आणि पाहणाराही नाहीए. तरी, चित्रपट कसा बनवलेला आहे, त्यात नट-नट्यांनी कसे काम केले आहे, दिग्दर्शन/संगीत कसे आहे, इत्यादी गोष्टींवरती भाष्य करण्याचा मला अधिकार नाही. आणि मी ह्यापैकी काही करणारही नाही.
खालील मजकूर निव्वळ “छावा” ह्या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटसृष्टी वर व “ऐतिहासिक चित्रपट” ह्या विषयावर सुचलेले विचार मांडण्यासाठी लिहीत आहे.
पार्श्वभूमी - चित्रपट आणि इतिहास
एखादा चित्रपट बनविण्यामागचा मुख्य हेतू समाज-प्रबोधन किंवा शिक्षण नसून, मनोरंजन आहे. आणि इतिहास म्हणजेच पूर्वी घडऊन गेलेल्या सत्य-घटना असतो. त्यामुळे, खरा इतिहास “रंजक” असेल, अशी अपेक्षा करू नये. तस्मात, इतिहासावर बनविलेले चित्रपट, हे खऱ्या इतिहासाशी जरी अगदी विसंगत नसले, तरीही त्यांचा मूळ हेतू मनोरंजन करण्याचा असल्यामुळे, काही घटनांचे नाटकीय रुपांतरीत होणार, काही घटना वगळल्या जाणार, काही घटना प्रत्यक्ष घडल्या त्याहून अधिक दिव्या स्वरूपात दाखविल्या जाणार, हे चालायचेच.
चित्रपटकार मंडळी हि काही समाज-प्रबोधन करायला बाहेर पडलेले कीर्तनकार किंवा साधू-पुरुष नाहीत. ह्यांचा हेतू काही म्हटले करी पैसे कमविण्याचा आहे, हे लक्षात ठेवावे. आणि जोवर केवळ खऱ्या इतिहासाशी निष्ठ अश्या गोष्टी मोठ्या पडद्यावर दाखविल्या जातात, तोवर ह्यात काही गैर नाही.
तरीदेखील, ऐतिहासिक चित्रपट बघून आपण “इतिहास शिकलो” असे जर कुणा प्रेक्षकाला वाटत असेल, तर तो त्यांच्या भ्रम होय. ऐतिहासिक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून बघायचे झाले, तर चित्रपटांतून एकच चांगली गोष्ट उत्पन्न होऊ शकते – ती म्हणजे, चित्रपटामुळे प्रेक्षकांमध्य इतिहासाबद्दल कुतूहल निर्मळ होणे, आणि ह्या कुतुहलामुळे त्यांना खरा इतिहास पुस्तकांमधून वाचायची प्रेरणा मिळणे. अन्यथा, चित्रपट ह्या संकल्पनेला निव्वळ “मनोरंजनाचे साधन” असेच समजायला हवे.
“छावा” चित्रपट कोणासाठी?
१४ फेब्रुवारी २०२५ ला प्रकाशित झालेल्या “छावा” ह्या चित्रपटाला देशभरात प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. अजूनही मिळत राहील. चित्रपट बघून आलेली लोक त्याचे फार कौतुक करत आहेत.
विशेषतः अमराठी जनतेमध्ये ह्याला फार प्रसिद्धी मिळत आहे. संभाजी महाराजांचे कर्तृत्व आणि बलिदान हे काही नुसते महाराष्ट्राच्या कल्याणासाठी नव्हते, तर समस्त हिंदू धर्मीयांसाठी होते. असे असताना देखील अद्यपरिस्थिती हि आहे कि मराठेतर हिंदू जनतेत बहुतांश लोकांना त्यांच्या शौर्यगाथे बद्दल माहित नाही, आणि हि काही चांगली बाब नव्हे.
“छावा” हा चित्रपट पाहून जर मराठेतर प्रेक्षकांमध्ये थोड्या का होईना लोकांत मराठा इतिहासाबद्दल कुतूहल निर्माण झाले, तर ते चांगलेच आहे. महाराजांचा इतिहास भारतभर जनतेला माहित असायला हवा, आणि ते होण्याकरिता निमित्त म्हणून जर चित्रपट बनवायचा असेल, तर असा चित्रपट हिंदी (किंवा अन्य) भाषांमध्ये बनायला हवा, ह्यात दुमत असण्याचे काही कारण नाही.
परंतु, “छावा” चित्रपट केवळ हिंदी मधेच प्रकाशित करण्यात आला आहे, आणि तरी देखील मराठी प्रेक्षकांचे लोंढे च्या लोंढे हा चित्रपट बघायला रंग लावीत आहेत. असे व्हावे, हे आश्चर्यजनक आहे, कारण वरील नमूत पार्श्वभूमी प्रमाणे, असे फक्त दोनच कारणांमुळे होऊ शकते -
१. “छावा” बघायला गेलेली मराठी जनता हा चित्रपट केवळ मनोरंजनाकरिता बघत आहे, किंवा,
२. ह्या जनतेमध्ये संभाजीमहाराजांच्या इतिहासाबद्दल पूर्णतः अज्ञान आहे, व हि मंडळी महाराजांची जीवनगाथा समजून घेण्याकरिता चित्रपट पाहावयास जात आहेत
ह्या दोन्ही गटातील जनतेच्या वर्तनावर माझा आक्षेप आहे. ह्यांना आपण “मनोरंजन-गट” आणि “अज्ञात-गट” असे सम्बोधुया.
अज्ञात-गट
ह्या गटवार आक्षेप असण्याचे कारण स्पष्ट आहे. महाराष्ट्रात राहून, मराठी संस्कृतीमध्ये लहानाचे-मोठे होऊन, जर कुणाला महाराजांचा इतिहास तिळमात्र सुद्धा माहित नसेल, तर हि एक अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. मी मुद्दामून “तिळमात्र” हा शब्द ह्यासाठी वापरत आहे, कारण चित्रपट बघून इतिहासाचे तेवढेच ज्ञान संपादन करता येणे शक्य आहे. संबंधित इतिहासाचे थोडीसुद्धा ज्ञान जर प्रेक्षकांना असले, तर ते “मनोरंजन-गटा”त मोजले जातील.
ह्या अज्ञात-गटातील जनतेच्या अज्ञानाला दोन पक्ष कारणीभूत आहेत: (१) ह्या मंडळींचे पालक, जे ह्यांच्यावर संस्कार करण्यात कमी पडले, आणि (२) महाराष्ट्र शिक्षण विभाग, जो योग्यतो अभ्यासक्रम रचण्यात कमी पडला. दोन्ही फार मोठे अपराध आहेत, असे मला वाटते, आणि दोन्हीचे लवकरात-लवकर निवारण करायला हवे हे नक्की. चित्रपट बघणे हा काही ह्या अज्ञानावर तोडगा नव्हे.
त्याउपर, चित्रपट हाच उपाय काहीकारणास्तव अवलंबवायचा असल्यास, “हिंदी चित्रपटातील नट” हि परकीय लोक आपल्याला येऊन आपलाच इतिहास शिकवतात, आणि आपल्याला तो त्यांच्या तोंडून ऐकावासा वाटतो, हि गोष्ट ह्या गटातील मंडळींच्या मराठी अस्मितेला झोम्बत कशी नाही, हे काही मला समजत नाही.
मनोरंजन-गट
ह्या गटातील लोकांना महाराजांच्या इतिहासाचे चांगलेच ज्ञान आहे, आणि हि लोक हा चित्रपट निव्वळ मनोरंजनासाठी पाहायला जात आहेत. त्यात काही गैर नाही. पण तसे असल्यास, केवळ मनोरंजनाच्याच दृष्टिकोनातून ह्यांचे विश्लेषण करायला हवे.
ह्या चित्रपटातील कथा हि काही नवीन नाही. शिवाजी सावंतांच्या “छावा” ह्या मूळ कादंबरीवरती हा चित्रपट आधारित आहे. संभाजी महाराजांच्या जीवनावर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपट बनवले गेले आहेत. मागच्यावर्षीच संभाजी महाराजांवर २ स्वतंत्र मराठी चित्रपट आले होते. केवळ मनोरंजनाकरिता हि कथा बघायची असल्यास, ह्या गटातील लोकांकडे मराठी विश्वात अनेक पर्याय आहेत. ते सगळे उपभोगून झाल्यानंतर जरका हि लोक “छावा” हा चित्रपट बघायला जात असतील, तर आमचे काही म्हणणे नाही. पण त्याउलट, हि लोक मराठी विश्वातल्या कलाक्रुत्या सोडून जरका हा चित्रपट पाहायला जात असतील, तर ते कृत्य आपल्याच भाषेच्या प्रति असलेल्या न्यूनगंडातून उद्भविलेले असणार.
हा न्यूनगंड मराठी जनतेमध्ये बराच प्रचलित आहे. आपली लोक मराठी गाणी सोडून हिंदी गाणी ऐकतात, हिंदी चित्रपट पाहतात, आणि हिंदी दूरदर्शन वाहिन्यांवर बातम्या आणि मालिका पाहतात, हे काही नवीन नाही. ह्या वृत्तेचे कारण मला अज्ञात आहे. पण अशी वृत्ती असताना मराठी चित्रपट/मालिका/TV कार्यक्रम कशे तरणार? त्यांचा मुख्य प्रेक्षकच जर इतर भाषांमध्ये रुळणार असेल तर त्यांचे भविष्य काय?
आपल्याकडे दर्जाची कमतरता आहे असे मुळीच नाही – “छावा” ह्या चित्रपटाचेच उदाहरण घ्यायचे झाले तर तो हिंदी चित्रपट मुळात एका मराठी कादंबरी वरती आधारित आहे. जर ह्या चित्रपटाला प्रसिद्धी मिळत असेल, तर अर्थातच कादंबरीचा दर्जा सुद्धा चांगलाच असणार, नाही का?
चित्रपट पाहणाऱ्या मराठी जनतेमध्ये किती लोकांनी मूळ कादंबरी वाचलेली आहे? गेल्यावर्षीच्या संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधिरीत दोन्ही मराठी चित्रपटांच्या एकूण कमाईपेक्षा सुद्धा जास्त कमाई “छावा” ह्या चित्रपटाची महाराष्ट्रात होते, असे का? ह्या कादंबरीचे rights विकत घेऊन एखाद्या निर्मात्याला मराठी मध्ये चित्रपट बनवून, तो चित्रपट चांगले पैसे कमावेल अशी अशा वाटण्यासारखे वातावरण बनवण्यात मराठी प्रेक्षक कुठे कमी पडला? “छावा” हा चित्रपट महाराष्ट्रात सुद्धा केवळ हिंदी भाषेत का प्रकाशित केला गेला?मराठी मध्ये ह्याचे dub व्हावे अशी मागणी मराठी प्रेक्षकांनी का नाही केली? मराठी मध्ये प्रकाशित न करून सुद्धा हा चित्रपट महाराष्ट्रात पैसे कमावेल, अशी अशा चित्रपटाच्या निर्मात्यांना मुळात आलीच कुठून? मराठी प्रेक्षकांची प्रतिमा अशी बनली आहे का, कि हा प्रेक्षक स्वतःच्याच भाषेला दुय्यम समजतो, आणि इतर भाषांमध्ये सहज रमतो? तसे असेल तर ते कितपत योग्य आहे, आणि त्याचे पुढे भविष्यात जाऊन काय परिणाम होतील? आणि तसे असल्यास, मराठी कलावंतांनी का बरे मराठी मध्येच काम करीत राहावे? त्यांनी हे सगळे सोडून हिंदी मधेच काम का करू नये? केवळ अभिमानापोटीच जर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी मध्ये काम करावयाचे असेल, तर तोच अभिमान मराठी प्रेक्षकांनी दर्शवायला नको का? आणि अभिमान गिळून जर मराठी कलावंतांनी हिंदी मध्ये काम करणे चालू केले, तर मराठी चित्रपटसृष्टी लोप नाही का पावणार?
हे सगळेच प्रश्न चिंतन करण्याजोगे आहेत.