“नमस्कार करतो काका!” म्हणत तो पाया पडायला खाली वाकला.
“अरे अरे काय करतोयस हे, असुदे!” त्याला आडवीत काका म्हणाले.
वाह, फार मेतकूट असेल नाहीका काका-पुतण्या मध्ये! दोघे एक-मेकांचे मित्रच असावेत अगदी!
तसे असले तर चांगलेच आहे, पण माझ्या पाहण्यात आलेल्या अशा प्रसंगानमध्य जवळीक तर सोडा, तर वर्षोन-वर्ष एकमेकांना न भेटलेले नातेवाईक अधिक आढळून येतात. आणि जवळीक असली जरी, तरीही नमस्कार केल्यावर अपेक्षित असलेल्या आशीर्वादांऐवजी असे काहीतरी ऐकायला आले कि खटकते.
वरील संवादाचे आणखी उग्र रूप म्हणजे कोणी नमस्कार केल्यावर “it’s OK!” म्हणणे. हेही काही वेळेला ऐकायला मिळते. जणूकाही नमस्कार केला, काकांचा आदर ठेवला, म्हणजे फार मोठी चूकच केलीये पुतण्यानी!
आता नमस्कार केल्यावरती “it’s OK!” अशी प्रतिक्रिया देण्यामागचा तर्क काय आहे ते मला माहित नाही, पण कल्पना केल्यास काही कारणे सुचतात खरी…
-
वरील प्रमाणे, “नमस्कार वगैरे केल्याने उगाच औपचारिकता येते” अशा भावनेनी लहानांचा “मित्र” बनण्याचा प्रयत्न म्हणून त्यांना नमस्कार करण्यापासून अडवणे.
हेतू चांगला आहे, पण मित्र बनण्याचा प्रयत्न अशाच प्रकारे करायला हवा का?
आणि त्याहूनही मोठा प्रस्न असा, कि आपल्या कुटुंबातल्या लहान मुलांशी घट्ट संबंध निर्माण करण्यासाठी “मित्र”च बनणे आवश्यक आहे का? सगळ्याच गोष्टींप्रती एकूणच आदर कमी होत चाललेल्या ह्या “ढगळ्या” समाजात आपण लहानमुलांचे प्रेरणास्थळ बनावे, कि त्यांच्या डझनभर मित्रांच्या टोळीत आपला नंबर लावावा, ह्याचा विचार केला पाहिजे.
आणि जरी “मित्र”च बनण्याचा हेतू असेल, तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी – ती म्हणजे, जरी हे माहित असले, कि खऱ्याखुऱ्या आदराउलट सवयीने (अथवा आई-बापानी सांगितले म्हणून) आपल्याला नमस्कार केला जात आहे, तरी तो नाकारून औपचारिकता कदाचित नाहीशी होईल, पण तेवढ्याने मित्रता हाती लागणार नाही. भेट झाल्यानंतर २ तास जर पोरगं गप्पा मारण्याऐवजी मोबाईल वर गेम खेळत बसणार असेल, तर आधी नमस्कार अडवून काही फायदा व्हायचा नाही. मित्रता निर्माण करायला मुळात संवाद लागतो, जो वाडीलधाऱ्यांनी साधायला हवा. -
ज्याला नमस्कार केला त्याला आपण थोर आहोत असे वाटत नाही. किंवा, कुणाला आशीर्वाद द्यायची आपली लायकी आहे ह्याच्यावर त्यांचा विश्वास नाही.
आता मुळात जर एवढी नम्रता कुणात असेल, तर केवळ त्याच्या नम्रतेपोटीच त्याच्या पाया पडायला हवे! पण इहलोकात अशी लोकं फार दुर्मिळ असल्याकारणाने हा पर्याय रद्द होतो.
आणि इतकी नम्र अशी एखादी व्यक्ती सापडलीच, तरी हे लक्षात घ्यायला पाहिजे कि आशीर्वाद देण्यामागची भावना हितचिंतनाची, शुभेच्छेची व “moral support” दर्शवण्याची असते, उपदेशाची नव्हे. आशीर्वाद देणे म्हणजे काही सल्ला देणे नव्हे. तस्मात आपण फार ज्ञानी/थोर नसलो तरी आशीर्वाद द्यायला काहीच हरकत नसावी! -
“आपण आशीर्वाद देवो वा ना देवो, काय फरक पडतो?” अशी भावना. नास्तिक/अधार्मिक जणांमध्ये असा विचार असणं साहजिक आहे. परंतु (सध्यातरी) वडीलधाऱ्या पिढीत नास्तिक लोकांची संख्या अगदी किरकोळ असल्यामुळे हा पर्यायही कटाप होतो.
-
आपण “कूल” अथवा “modern” असण्याची एखादी विकृत कल्पना! आता हा पर्याय समजूनघेण्या पलीकडचा आहे. आपल्याला धाकट्यांनी नमस्कार करू न देणे, हे बहुदा हल्ली गृहस्थानमध्य “कूल” समजले जात असावे. तमाम तरुणाई “कूल” बनायला जे आचरट चाळे करते त्याहून हे बरेच मवाळ असले, तरी त्याची निरर्थकता तेवढीच. पश्चिमेच्या लाटांमध्ये वाहत जाणारे कोणी एखाद्याला नमस्कार करण्यापासून थांबवत असेल, तर त्यांना काय सांगावे? असो. ह्या लाटांमध्ये आपली संस्कृती बुडून मेली नाही म्हणजे मिळवले.
वरीलपैकी कुठलेही कारण तसे बघितले तर पिढ्यान-पिढ्या चालत आलेल्या, मोठ्यांचा मान राखून त्यांचे आशीर्वाद घेण्याच्या रीतीला खंड पाडण्या इतके मोठे मुळीच नाही. पण ह्या परंपरेला आज विसरले जाण्याचा धोका आहे हे मात्र खरे.